वृत्तपत्र व्यवसायाला आर्थिक पाठबळ देणार
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची पत्रकार संघाच्या वार्तालापमध्ये ग्वाही
औरंगाबाद :- पत्रकार संघाच्या प्रस्तावानुसार करदात्याला वृत्तपत्र खरेदीवर वार्षिक पाच हजाराची सवलत देण्याबरोबरच वृत्तपत्र व्यवसायाला पाठबळ देण्यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न करू. तसेच पत्रकारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि जनसामान्यांपर्यंत योजना पोहचाव्यात यासाठी नोव्हेंबर महिन्यात औरंगाबाद येथे मराठवाड्यातील पत्रकारांसाठी पहिली कार्यशाळा घेण्यात येईल. पत्रकारांना सरकारच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा आणि पत्रकार सक्षम होण्यासाठी आर्थिक साक्षर व्हावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी लघू वृत्तपत्र क्षेत्र आणि पत्रकार यांच्या समस्या व उपाय यावेळी सांगुन लक्ष्य वेधले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्या उपस्थितीत शनिवार दि. 16 ऑक्टोंबर रोजी वार्तालापाच्या दुसर्या सत्राचा शुभारंभ झाला. यावेळी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या हस्ते डॉ.कराड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लघू वृत्तपत्र आणि पत्रकारांसमोर निर्माण झालेल्या समस्या आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी करदात्यांना वृत्तपत्र खरेदी वर वर्षीय पाच हजारांची सवलत द्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष मुंडे यांनी केली. त्यावर बोलतांना डॉ.भागवत कराड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार आम्ही शेवटच्या घटकापर्यंत जाऊन योजनांचा लाभ मिळतो का? आणि समस्या काय? हे जाणून घेतोत. आज वृत्तपत्र आणि पत्रकारांसमोरच्या समस्या आणि अडचणींची माहिती वसंत मुंडे यांच्या मुळे मिळाली. संघाच्या प्रस्तावानुसार वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काय करता येईल याबाबत विचार करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणार्या मंत्री गटाच्या बैठकीत वृत्तपत्र क्षेत्रासमोरील समस्यांची माहिती देवू अशी ग्वाही त्यांनी दिली. तर वृत्तपत्र विक्री किंमत, आयकर भरणार्या करदात्यांसाठी वृत्तपत्र खरेदीवर सवलत देण्याबरोबरच विविध योजनांचा पत्रकारांनाही लाभ मिळाला पाहिजे. यासाठी आपला प्रयत्न राहील. पत्रकार आर्थिकदृषट्या सक्षम असेल तर तो चांगले काम करू शकतो. त्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांची पत्रकारांना माहिती व्हावी, पत्रकारांनाही योजनांचा लाभ घेता यावा. तसेच सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी केंद्र सरकारच्या वतीने देशातील पहिली मराठवाड्यातील पत्रकारांची कार्यशाळा औरंगाबाद येथे नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली. यावेळी योजनांचे अधिकारी, बँकांचे अधिकारी, यशस्वी व्यवसायिक, उद्योजक उपस्थित राहतील.
करदात्यांना वृत्तपत्र खरेदीवर सवलत द्यावी – वसंत मुंडे
वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने आयकर करामध्ये वृत्तपत्र खरेदीवर वार्षिक पाच हजाराची सवलत द्यावी. यामुळे वृत्तपत्राचा खप वाढेल. त्यातून महाराष्ट्रात पाच लाखापेक्षा अधिक लोकांना रोजगारात स्थैर्य मिळेल. सरकारचे एक रुपयाचेही नुकसान न होता केवळ सवलतीमधून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि या व्यवसायाला पुरक असणार्या कच्चा माल खरेदीमधून मोठ्या प्रमाणात कर मिळणार आहे. सरकारच्या योजनांचा पत्रकारांना लाभ व्हावा आणि बँकांनी वृत्तपत्र व्यवसायाला व पत्रकारांना कर्ज द्यावे. यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली.
यावेळी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभू गोरे, दीपक म्हस्के, शांताराम मगर, अनिल सावंत, छबूराव ताके, मनोज पाटणी, मुकेश मुंदडा, विलास शिंगी, अभय विखनकर, राजेंद्र बढे, शेख जमीर, संतोष करपे, शरफोद्दीन शेख, रमेश वानखेडे, राधाकृष्ण सोनवणे, जीवभाऊ इंगळे, संजय व्यापारी, अल्ताफ पीरजादे, प्रशांत सुर्यतळे यांची प्रमुख उपस्थिती होती.