औरंगाबाद :-
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना आज सकाळीच ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक करत कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया येत असताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी, नवाब मालिकांच्या अटकेच राष्ट्रवादी-काँग्रेस आणि शिवसेना राजकारण करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, मला वाटते नवाब मलिक यांना झालेली अटक ही राजकीय दृष्ट्या झालेली अटक नाहीत. देशातील जनतेला माहीत आहे की, मुंबईतील बॉम्बस्फोट मागे दाऊद इब्राहीमचा हात होता. अनेक लोकांचे बळी गेले होते आणि त्यानंतर दाऊद इब्राहिम भारत सोडून बाहेर गेला होता. पण त्यांची बेनामी मालमत्ता इथेच होती, जी इकबाल कासकर आणि दाऊद याची बहीण हसीना पारकर यांच्या ताब्यात होती. दरम्यान जेलमध्ये गेलेल्या इकबाल कासकर याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांनी त्या बेनामी मालमत्ता खरेदी केल्या. मलिक यांच्या माणसांनी अवघ्या ३०-४० लाखात त्या घेतल्या आणि त्याआधारे मलिक यांना अटक करण्यात आल्याचे दानवे म्हणाले.
तर पुढे बोलताना दानवे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहे की, त्यांना माहीत होते मलिक यांना अटक होणार होती. कारण ते भाजप विरोधात बोलतात. पण तसं नसून इकबाल कासकर याने जेलमध्ये मलिक याचं नाव घेतल्याने ते जेलमध्ये जाणार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत असल्याने ते तसं म्हणत असावे. त्यामुळे या अटकेमागे कोणतीही राजकारण नसून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने ईडी कडून ही अटक झाली असल्याचं दानवे म्हणाले.