जालन्यात ३० हजारांची लाच घेताना दोन पोलिस जाळ्यात
जालना प्रतिनिधी | दि ०२ ऑक्टोबर
जालना रेड्यांच्या टकरीचा गुन्हा दाखल असलेल्यास आरोपी न करता तपासात मदत करण्यासाठी ठाण्यातच ३० हजार रुपयांची लाच घेणारा सहायक पोलिस निरीक्षक व शिपाई लाचेच्या जाळ्यात अडकल्याची घटना जालना शहरातील तालुका पोलिस ठाण्यात शनिवारी घडली . सुरेश बापूराव कासुळे ( ३६ , सहायक पोलिस निरीक्षक , भालगाव पाथर्डी , जि . अहमदनगर ह.मु. यशवंतनगर , जालना ) , चरणसिंग विजयसिंग सिंगल ( ३२ , शिपाई , आरदखेडावाडी ता . जाफराबाद , ह.मु. पोलिस क्वार्टर , जालना ) अशी आरोपींची नावे आहेत . जालना तालुक्यातील पीरकल्याण परिसरात रेड्यांच्या टकरी लावल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हे दाखल झाले होते .
यात आरोपी म्हणून तक्रारदाराचे नाव होते . या गुन्ह्यात तुम्हाला आरोपी केले जाणार नाही , तुमचे चार्जशीटमध्ये नाव येणार नाही , असे सांगून ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली . यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला असता , शनिवारी सापळा लावून ही कारवाई करण्यात आली . ही कारवाई उपअधीक्षक एस . बी . पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय एस . एस . ताटे , शिवाजी जमधडे , गजानन घायवट , कृष्णा देठे , गणेश बुजाडे , गजानन कांबळे , प्रवीण खंदारे यांनी केली .