संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी – जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर
जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांची कारवाई ची मागणी
न्यूज जालना प्रतिनिधी:
दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक रवींद्र तहकिक यांनी आपल्या सडेतोड लिखाणातून शेंदाड नाऱ्याचा भयताड पोऱ्या या मथळ्याखाली वास्तव लिखाण केले होते.मात्र हे वास्तव लिखाण अंगाला झोंबल्याने माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकानी दैनिक लोकपत्रच्या कार्यालयात जाऊन कार्यकारी संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर भ्याड हल्ला करत काळे फासण्याचा निंदनीय प्रकार केला.
सदरील घटना निषेधर्य तर आहे मात्र अशा भयताड हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अन्यथा संपूर्ण मराठवाड्यात रस्त्यावर उतरून पत्रकार आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी दिला आहे.
दैनिक लोकपत्रचे कार्यकारी संपादक ज्येष्ठ पत्रकार रवींद्र तहकिक यांनी आपल्या दैनिक लोकपत्रच्या माध्यमातून मराठा आरक्षण संदर्भात संभाजीराजे महाराष्ट्रातील विविध पक्षांतर्गत लोकप्रतिनिधींना भेटत असताना ते केवळ राणे यांची भेट टाळून इतर लोकप्रतिनिधींना भेटत असल्याचा द्वेष मनात ठेवून त्यांच्या चिरंजीवाने नको ती गरळ ओकली होती.त्यावर आपल्या सडेतोड लेखणीतून वास्तव मांडणी ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकिक यांनी केली.
सदरील लिखाना संदर्भात जर काही अक्षेप वाटला तर सनदशीर मार्गाने त्यांच्या समर्थकांनी न्याय मागणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता लॉकडाऊन असताना चार पेक्षा अधिक लोक एकत्र येत त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक लोकपत्रच्या कार्यालयात घुसून ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकिक यांच्यावर जीवघेणा हल्ला करत शिवीगाळ करून तोंडाला काळे फासण्याचा प्रकार 30 मे रोजी केला. या घटनेनंतर ज्येष्ठ संपादक रवींद्र तहकिक यांनी अशा भ्याड हल्ल्याला न घाबरता संबंधित एम आय डी सी चिकलठाणा पोलिस स्टेशनला हल्लेखोरा विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आहे. हल्लेखोर कॅमेराबद्ध झालेले आहेत. त्यामुळे हल्ला करणारे कोण आहेत ? हे लपून राहिलेले नाही.
या गंभीर प्रकरणात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. तेव्हा पोलिसांनी सदरील हल्लेखोर विरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. याशिवाय लॉकडाउन असतानासुद्धा चार पेक्षा अधिक लोक एकत्र येत त्यांनी कायदा हातात घेतलेला आहे. तेव्हा या कलमाअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली पाहिजे.संबंधित सर्व आरोपी 24 तासाच्या आत जर अटक करण्यात आले नाहीत तर संपूर्ण मराठवाड्यातील पत्रकार लोकशाही मार्गाने न्याय हक्कासाठी लढा उभारतील असा इशारा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांनी दिला आहे.पत्रकार संघाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.